गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

किंमत

किंमत .
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
पुस्तकातली प्रतिज्ञा पुस्तकातच
देशाबाहेर गेल्यावर दिसे भारत महान
देशात मात्र भिन्न झेंड्यांसाठी मानापमान
प्रांत भाषा धर्म जात पोटजात इत्यादि
वितंडवादाला पुरतात कारणे साधी साधी
माणुसकीचे गोडवे फक्त तोंडी लावायला
ओळखत नाही मात्र सख्ख्या शेजार्याला
छत्रपती शिवाजी फुले शाहू आंबेडकर
शुध्द स्वार्थासाठी या नावांचा वापर
अर्थ स्वातंत्र्याचा अनिर्बंध स्वैराचार
भ्रष्टाचार आता झालाय शिष्टाचार
सत्ता संपतीसाठी लोकशाही वेठीला
शरण आम्ही जागतिकिकरणाच्या लाटेला
देश आहे स्वतंत्र आर्थिक गुलामीची किंमत देवून
स्वदेशी नी स्वावलंबन लाटेत गेले वाहून...
      .....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

स्वातंत्र्य.

स्वातंत्र्य.

परकियांच्या त्या गमनानंतर
आपापसातले मुळी वैर नको
भेद पसरविणारे वैरी आपले
मिटवून टाकू त्यांची खैर नको
सुखी आनंदी जगणे इथले
गुलामीची बिल्कूल बात नको
घरभेद्याना व्हावी कठोर शिक्षा
देशद्रोह्याना मुळीच साथ नको
जातीधर्म रहावे आत घराच्या
तिरंग्या व्यतिरिक्त तो रंग नको
देशाभिमान मनामनात भरावा
रक्तरंजीत कुठे रसभंग नको
हुतात्म्यांचे त्या जेथे रक्त सांडले
भेदाभेदास तेथे मुळी भाव नको
स्वातंत्र्य हे बहूमोल भारताचे
स्वैराचारास बिल्कूल वाव नको
.....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

तल्लफ!

    तल्लफ!

चिमुटभर ती स्नेह पसरवते
अनोळखीसही बोलते करते
कामातून थोड़ी उसंत मिळते
संभाषणास ती कारण ठरते
अनेकास पण अप्रिय असते
अडाणीपणाची ओळख ठसते
निंद्य जरी ती जनात दिसते
चिमटी मधूनी घशात शिरते  
तंबाखू तल्लफ जीवांशी खेळते
दारी मरणाच्या नेवून ठेवते

       ........ प्रल्हाद दुधाळ