बुधवार, २८ डिसेंबर, २०११

महात्मा वंदन.


महात्मा वंदन.
अनिष्ट रुढींचे छेदले कुंपण,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
खुली महीलांस शाळा दारे,
आसुडाचे सत्तेला फटकारे,
कर्मठ रूढींना दिले हादरे,
झिजलास की जैसा चंदन,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
उभारला लढा तो समतेचा,
पद द्लितांच्या उद्दाराचा,
हातभार पत्नी सावित्रीचा,
भेदले परंपरांचे बंधन,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
अनाथांचे होता नाथ तुम्ही,
बहुजनांस दे नवी उभारी,
भारतभूचा द्रष्टा नंदन!
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
          प्रल्हाद दुधाळ.

जग तुझे!


जग तुझे!
होऊ नको रे असे,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे!
नाहीच तुझ्या कवेत,
मावणार ते सगळे!
मानू नको सर्वग्यानी,
अवसान नको ते बळे!
लागले म्हणतील लोक
हे कसले वेडे चळे!
विश्वाची भव्यता जाण
जग तुझे छोटे तळे!
मनी असू दे समाधान
फुलवून जीवनी मळे!
  प्रल्हाद दुधाळ.


कुंपण.


कुंपण.
कितीतरी बहुमोल क्षण
फुक्कट घालवतो आपण!
नुसत्या काळज्या करण्यात
रूसवे फुगवे अन भांडणात!
खरं तर..........
आयुष्य हे किती क्षणभंगुर
कुठल्याही वळणावर संपणारं...
नाही का हे जगता येणार
निव्वळ निखळ आनंदात?
सगळी कपोलकल्पित कुंपण तोडून
राग लोभ मत्सराची...
छोट्या पण खोट्या
अहंकाराची!
   प्रल्हाद दुधाळ.

किती दिवस?


  किती दिवस?
गुपीत मनातले किती
मनातच राखायचे?
सांग सखे कधी,
मनातले बोलायचे?
दिवस जातील असे,
महीने जातील असे,
नजरेच्या झुल्यावर,
किती दिवस झुलायाचे?
लोक निंदेस या इथल्या,
भाव तो का द्यावा?
बंधमुक्त जगण्याचा,
सोस का न बाळगावा?
शेंडी तुटो वा पारंबी,
कुणाशी का झगडायचे?
सांग सखे आता तरी,
किती दिवस झुरायचे?
    प्रल्हाद दुधाळ.

कात.


कात.
मन माझे संभ्रमात आहे!
हातात हा तुझा हात आहे!
तिमीर हा संपणार आता,
आली चांदणी रात आहे!
मी गुरू केले संकटांना,
निर्धाराने केली मात आहे!
रस्ता हा नवा सुखाचा झाला,
मिळाली जी तुझी साथ आहे!
लावण्य बहरले नव्याने,
टाकलीस पुन्हा तू कात आहे!
      प्रल्हाद दुधाळ.

कसोटी.


कसोटी.
दिले धरावयास बोट
धरतात हात कोणी!
जगण्यातली जाते मजा,
आणतात वात कोणी!
कोजागिरीचा चन्द्र अन,
भरले फेसाळ पेले,
रसभंग झाला कसा,
केली अंधारी रात कोणी!
असतात शीते जेंव्हां,
जमतात भुते फार,
वेळ येता संकटाची,
सोडली ही साथ कोणी?
देव माणुनी पुजियले,
माणसे ती गेली कुठे?
येता क्षण कसोटी चा,
मारली ती लाथ कोणी?
    प्रल्हाद दुधाळ.

भज थोडा.


     भज थोडा.
कशास लावतो कुणा लळा?
लागतील अंतरास कळा
ठरणार जगात बावळा
येणार कुणा न कळवळा!
ही काही क्षणांची बात
नाहीच युगांची ही साथ
मिळणार एक दिवस लाथ
अमरत्वाच्या नको कैफात!
कमावले जे धाव धावून
कधी कुणास ठकवून
पहा तू मागे जरा वळून
नाही उपयोगी जाता जळून!
तुजपाशी आहे वेळ थोडी
पसरू दे भवती गोडी
सोड अहंकार बंगला माडी
निर्मिकाचे हाती तुझी नाडी!
सारे येथेच रहाणार
तुजसवे काय ते नेणार?
भले जगासाठी करणार
तयानेच नाव उरणार!
एकेक महत्वाचा क्षण
मारू नको उगा मन
हरपून ते देहभान
भज थोडा भगवान!
      प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

गूढ


गूढ.
होते कुठे तेथे आभाळ फाटले?
आकांक्षांचे पंख कुणी ते छाटले?

सग्यासोय-यांचा आधार तो मोठा,
प्रेम त्यांचे असे कसे हो आटले?

मनातली गुपीते मनी राहीली,
शल्य अंतरीचे ह्र्दयी साठले.

कळेना काय चुकलेले ते माझे,
भोवती संशयाचे ढग दाटले.

हा खेळ नियतीने मोडला कसा?
संकटानी मला खिंडीत गाठले.
                    प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

शहर.

शहर.
झाला समस्यांचा
आता कहर आहे.
हेच आहे का माझे
प्रिय ते शहर आहे?
बेशिस्त वहातुक येथे
धुराने माखले रस्ते,
वागणे मुक्त असे की
जो तो अमर आहे.
शांतता लोपली अन
गोंधळ येथे माजला,
गांजलेली माणसे ती
तनावाची लहर आहे.
प्रल्हाद दुधाळ.

लक्षात घे!

लक्षात घे!
अत्तराच्या कुपीमधेच,
…….वेळी अवेळी….
कामाला यावे म्हणून...
विष ठेवण्याची तुझी कल्पना!
.........फारच आवडली!
फक्त आवडली नाही....
……तुझी मनिषा....
…जमलंच नाही जर,
सुगंध पसरवणे तर...
कालवायचे विष!
पण लक्षात घे.....
अगं स्नेहभरल्या नजरेने..
तिरस्कारही बदलतो प्रेमात!
मग तुझ्याकडील विषाचे...
अमृत व्हायचं का थांबणार आहे?
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

प्रारब्ध .

प्रारब्ध .
अरेरे! जरासा थांबला असतास तर.....
अजुन थोडा प्राणपणाने लढला असतास तर....
निसर्गाने क्षण दोन क्षण कृपा केली असती तर....
वार्‍याने आपला वेग थोडा मन्द ठेवला असता तर....
....तर ...तर आज तू ...
असा अवेळी कोमेजला नसतास.
एखाद्या राजेशाही महालात ,
सजवली असती सुन्दर फुलदाणी!
एखाद्या सुन्दर युवतीचा ,
खुलवला असता केशसंभार!
एखाद्या रसिक प्रेमिकाने तुला,
अर्पिले असते प्रेयसीला,
झाला असतास उत्कट प्रेमाच प्रतीक!
एखाद्या भाविकाने भक्तीभावाने,
वाहिले असते भगवंताचे चरणी,
झाल असत आयुष्याच सोन!
पण...
पण या जर तर च्या गोष्टी!
असाच सुकलास,
प्रारब्ध् तुझे, दुसरे काय?
प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

माणुस.


माणुस.
माणुस असा माणसा सारखा
कधी कधी वागतो पशुसारखा.
चेह-यावर मुखवटा सभ्यतेचा
अंतर्यामी कधी पिसाटासारखा.

माणुस असा माणसा सारखा
कधी कधी वागतो देवासारखा.
दीन दलितांचा होई कैवारी
कधी दानशुर कर्णासारखा.

माणुस असा माणसा सारखा
रहावा सभ्य माणसा सारखा.
एकमेका सहाय्य करून सदा
वागावा जगावा माणसा सारखा.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!
यार.


यार.
उचल्यांचा जरी तो बाजार होता.
एकमेका तयांचा मोठाच आधार होता.

लुटले जरी तयांनी घर माझे कष्टाचे
मानतो तरीही आदर्श तो शेजार होता.

वागू नये तसा वागलो मी त्या क्षणांना
होय मी पाळलेला वृथाचा अहंकार होता.

जाळून टाकल्या आता सा-या आशा आकांक्षा
जीवंत राहीलो मानतो मी उपकार होता.

चालला कुठे संकटांनो सोडुन एकट्याला
मतलबी दुनियेत तुम्हीच माझे यार होता.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

एक विराणी.


एक विराणी.
मीच माझ्या जीवनाची सांगते कहाणी
वाया नको दवडू डोळ्यामधील पाणी.

बितला तो काळ होता वास्तव की स्वप्न?
धुंद प्रणयाची आता शोधते निशाणी.

रात्र कोजागिरीची स्पर्शामधील धुंदी
आठवणी चाळवितात ठिकठिकाणी.

संपली ती कहाणी स्वप्ने विरून गेली
वाटसरू ऎकती माझी प्रारब्धगाणी.

ना ऎकणारे येथे माझे जरी कुणीही
निरव वाटा ऎकती ही माझी विराणी.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

जगणे असे.


जगणे असे.
नाही मोडली कधी आयुष्याची चाकोरी
आपुला संसार अन आपली नोकरी.
अशा जगण्याला का जिंदगी म्हणावे,
भासते जगणे असे त्यांचे केविलवाणे.

सोसावा तो अकोल्याचा उन्हाळा
महाबळेश्वरचा तो धुंद पावसाळा.
गोवा कोकणचा स्वच्छ समुद्र डुंबावा,
गावे मनुष्यजन्माचे रम्य रम्य गाणे.

अहंकार सोडून ही माणसे जोडावी
स्नेहासाठी ती जनलज्जाही सोडावी.
प्रेम ते द्यावे घ्यावे रहावे आनंदाने,
अशा जगण्यात असणार काय उणे.

अशा जगण्यावरी जिंदगी उधळावी
सर्व सुखे येथली मुक्तपणे भोगावी.
जन्म एकदाच असा फिरून तो नाही,
जगू असे मस्त की सार्थक हे जगणे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

हमखास.


हमखास.

घेतलेला उधारीने जरी प्रत्येक श्वास आहे.
हारले येथे लढाया त्यांचीच मिजास आहे.

या महफिलीत माझ्या असणार तुझी हजेरी
ह्रदयात हळव्या या जागा तुझी खास आहे.

तडफडे रस्त्यात कोणी ना डोकावे एक
मरणाची ती कुणाच्या फिकीर कुणास आहे.

भरल्या पोटी चर्चा दुष्काळावरती झडती
सत्तेच्या उत्सवी अडेना कुणाचा घास आहे.

वागणे बिनधास्त आहे डोळ्यात नाही पाणी
ठाऊक कुठेतरी,ओलावा हमखास आहे.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

शब्द.


शब्द.
शब्द बहुरूपी
रंगबदले शब्द.
शब्द बोचरे
ओथंबले शब्द.
शब्द मवाळ
लाचार शब्द.
शब्द दयेचे
मायेचे शब्द.
शब्द लाचार
आधार शब्द.
शब्द फटकारे
शब्दासाठी शब्द
शब्द पाळलेले
शब्दातुन शब्द.
शब्द शब्द शब्द
नुसतेच शब्द.
...प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!
.

तू म्हणायचीस.


तू म्हणायचीस.

तू नेहमी म्हणायचीस
माणसानं कायम हसत रहावं
दुस-याच्या आनंदानेसुध्दा नाचावं
एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी व्हावं!
असच काही बडबडायचीस....
मला ही मनापासून सगळं पटायचं....
पण काय सांगू...
....आज...मी हसतो तेव्हा...?
लोक माझ्याकडे बघतात एक वेडा म्हणून
कुणाला आनंदात पाहून बेभान नाचतो तेव्हा...?
माझ्याकडे फेकले जातात दगड!
आणि...
सहभाग हवा होता....
तुझ्या सुखदु:खात
पण...ती..
आधीच वाटली गेली आहेत!
.....प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!

अपेक्षा.


अपेक्षा.
नको आहेत तुमची पोकळ आश्वासने
नकोच तुमची ती वांझ भाषणे.
नको आहेत कोरडे दयेचे शब्द
अथवा खोटी खोटी सहानुभूती.
हवेत फक्त सुखाचे दोन घास.
नको आहेत तुमचे संप मोर्चे
रस्ता रोको वा वांझोटा सत्त्याग्रह.
नको आहेत कोरडे उसासे
किंवा कुणाची मेहेरबानी.
आम्हाला हवी फक्त
स्वकष्टाची पोटभर भाकरी!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

साद.


साद.
महफ़िलीला रंग देण्या नशा तू होऊन ये.
सूर देण्या गीता माझ्या संगीत तू होऊन ये.

सोसलेल्या वेदनांना ह्रदयी मी बाळगले
वेदना त्या शमविण्या फ़ुंकर तू होऊन ये.

अनुभवली जीवनात बेछूट ती पानगळ
फुलवण्या पुन्हा मला वसंत तू होऊन ये.

जंगल हे भयानक दिशाहीन मी इथे
दाखविण्या मार्ग मला पायवाट तू होऊन ये.

लाख असणार अडथळे नको करू पर्वा त्यांची
साथ देण्या साती जन्मे गॄहलक्ष्मी तू होऊन ये.

प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

वाट.


वाट.
अस्मिता कुणाची इथेही भंगली आहे.
लाखोली शिव्यांची ओठी खोळंबली आहे.

उपाशी इथे जरी जवान त्या क्रांतीचे,
महफ़िल गुलाबी एक रंगली आहे.

नाही आळवले जरी तुकोबाने देवा,
गाथा इंद्रायणीमधे तरंगली आहे.

करिती टवाळी जरी माझ्या कल्पनेची,
कथा माझी वेदनेने ओथंबली आहे.

चलतोय आज इथे मी उंटाच्या चालीने,
बंडास्तव वाट ही अवलंबली आहे.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

बातमी.


बातमी.
नाविन्य ते काय आता हे घडतेच नेहमी.
विनाशाचीच आमच्या नेहमीची ती बातमी.

वागण्या बोलण्याची कशी असणार संगती?
आश्वासने उन्नतीची आहेत ती मोसमी.

वागणे माझेच मला जेथे वागते आहे कोडे,
कशी कुणाच्या वागण्याची मी घेणार हमी?

मुर्दाड माणसांची सुस्त वस्ती मस्त ही आहे,
सारी कोडगी मने अन माणसे घुमी घुमी.

ताटकळते मी तुझ्यासाठी किती हा उशिर?
तुझ्याविना महफ़िल वाटतसे सुनी सुनी.
प्रल्हाद दुधाळ.
.........काही असे काही तसे!

प्रियेस.


प्रियेस.
तुझ्या मायेच्या पंखात
हसते खेळते हे घरटे.
तुझ्या हातच्या घासाने
मन माझे तृप्त होते.

प्रश्न समस्या येथल्या
चुटकीसरशी सुटती.
तुझ्या स्नेहाळ शब्दांनी
मने मनाशी जुळती.

घरी दारी कामे तुला
नाही क्षणांची विश्रांती.
प्रश्न छळतो ग मला
चेह-यावरी सदा शांती.

तुझ्या समर्थ हातांचा
असे आम्हाला आधार.
तुझ्या माझ्या संगतीने
व्हावा सुखाचा संसार.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

देवा.


देवा.
देवा तुला कधी
देखले ना दगडी
माणसात रे तू
आशा माझी ही वेडी.

देवा न पुजले
शेंदराच्या दगडा
ह्रदयात वसे तू
विश्वास हा भाबडा.

घातला न कधी
कर्मकांडांचा घोळ
नाही वाचले अंधपणे
अध्यात्म एक ओळ.

पदोपदी मला तू
अनुभवाने भेटला
कृपाकटाक्ष तुझा
अंत:करणात साठला.

क्षणोक्षणी रे तू
मार्ग नवे दाखवी
माणसांमधल्या देवाला
पुन्हा पुन्हा रे भेटवी.
प्रल्हाद दुधाळ.
...काही असे काही तसे!

बुधवार, २० जुलै, २०११

मनोगत खुडल्या कळीचे.

मनोगत खुडल्या कळीचे.
जगण्यातले आव्हान ते पेलायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
झालात कसे तुम्ही एवढे कठोर?
अव्हेरले निसर्गदेणे नाकारून मम जगणे!
काय दोष माझा कळी खुडली अवेळी?
जीवनगाणे रम्य मला ते गायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
ममतेचा झरा तो ह्रदयीचा कसा आटावा?
आगमनाचा माझ्या अपशकुन वाटावा?
नारी असुन स्रीजन्माचा अभिमान नसावा?
भलेबुरे जगातले या अनुभवायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
मायभगिनींची महती कशी भुलले हो?
धरित्रीचा गळा तुम्ही कसा घोटला हो?
कशी आठवली नाही सावित्री जिजाई?
मानवतेचे मंदिर भव्य उभारायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
...........काही असे काही तसे!

शुक्रवार, ८ जुलै, २०११

खजिना.

खजिना.
कोण काय म्हणाले
नको करू चिंता मना.

मनासारखे जगावे
हीच ठेव कामना.

इच्छा आकांक्षा मनीच्या
दाबू नको रे अशा तू.

स्वच्छंदी जगून आनंदे
दे जीवना दिशा तू.

तुझा हात मिळाला
तुझा साथ मिळाला.

संसारात खुल्या सुखाचा
खजिना हातोहात मिळाला.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

संकरित.

संकरित.
प्रत्येकजण संशयखोर या गर्दीत आहे.
हत्यारे आपापली हरेक परजीत आहे.

गातात महती एकता अन समानतेची,
माणुसकीचे वागणे परंतु वर्जीत आहे.

सांगतात गोडवे साध्यासरळ रहाणीचे,
पेहराव परंतु तयांचा भरजरीत आहे.

नावापुढे जनसेवकाची लावली उपाधी,
सत्ता तयांची परंतु घातल्या वर्दीत आहे.

असणार कसा मेळ वागण्याबोलण्याचा?
हे पेरले बियाणे तयांचे संकरित आहे.

प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

मोह.

मोह.
अगम्यसे आता काही घडाया लागले.
चेहरे नको ते का आवडाया लागले.

वर्षाव शिव्याश्यापांचा ज्यांनी होता केला,
अवचित पाया असे का पडाया लागले.

तो नकार कुरूप त्या चेह-यातला होता,
मनातल्या सॊंदर्यावर मन का जडाया लागले.

तरल आठवणींना गाडून मी आलो,
अवशेष असे का सापडाया लागले.

आदर्श परिवार होता मने अभंग होती,
एवढ्या तेवढ्या ने खटके का उडाया लागले.

आत्मा अमर आहे सोड मोह शरीराचा,
जाणुनही मन जगण्यास्तव धडपडाया लागले.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

बुजगावणे.

बुजगावणे.

कंगाल आयुष्य इथले हरेक रडगाणे आहे.
भेटतो तो वाजवतो आपापले तुणतुणे आहे.

दुमदुमले रस्ते हे मोर्चा अन मिरवणुकांनी,
सत्तेसाठी जनतेला दिले हे हुलकावणे आहे.

विकला कुणी आत्मसन्मान अन झाला चेला,
का असावे इतके जीणे यांचे लाजिरवाणे आहे.

चाड नीती अनीतीची हवी कशास ही खोटी,
तुडवा पायी नका घाबरू ते बुजगावणे आहे.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

बरे नाही.

बरे नाही.

जीव लाऊन असे उगा टाळणे बरे नाही.
वेरहवेदनेत असे जाळणे बरे नाही.

चिंब प्रेमात पुरता भिजला होतो तुझ्या,
उपहासाच्या उन्हात या सोडणे बरे नाही.

रेखाटले स्वप्नचित्र भाबडे एक देखणे,
रेषा वाळुवरच्या अशा पुसणे बरे नाही.

धुंद स्नेहाळ सहवासाचा तुझ्या भुकेला मी,
भुकेल्याचा घास तो असा तोडणे बरे नाही.

घायाळ पुरता मी आता सहेना ही यातना,
एखाद्याचा एवढा अंत पाहणे बरे नाही.

चुकलो जरासा गुन्हा माझा आहे मला मान्य,
एवढीशीच चूक ती! रागावणे बरे नाही.
प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!

रविवार, २६ जून, २०११

उशीर.

उशीर.
आर्त विनवणी तुझी अचानक स्मरून गेली.
नकळत आसवांची सर एक झरून गेली.

नाकारले तुला वागणे माझे मतलबी होते,
अंतरात जखम ओली ती एक उरून गेली.

चोखाळतोय वाट आता मी काटाकुट्यांची,
मखमली चांदणी रात केव्हांच सरून गेली.

बेफाम बेलगाम जवानीची होती नशा ती,
अघोरी लालसा ती स्वप्ने कुस्करून गेली.

जगणे आता व्यर्थ आणि मरण अनर्थ आहे,
अचेतन देह सारा आकांक्षा मरून गेली.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

सावित्री वंदना.

सावित्री वंदना.
अखंड सेवा वृत्तीने पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
कर्मठांचे दगड झेलले तू,
घेतलास सेवेचा वसा तू,
उघडल्या मुलींच्या शाळा,
आम्हा शिक्षणदान दिले तू,
कार्याने पवित्र या पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
अनाथ बालकांची आई तू,
गांजल्या विधवांची दाई तू,
साथ जोतीबांच्या कार्याला,
सावली पतीची झाली तू,
तुझ्यामुळॆ आम्ही सबला पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
रूढी परंपरांना छेदले तू,
दलितांसाठी आयुष्य वेचले तू,
रूग्णांची करून सेवा,
अजरामर झालीस तू,
स्रीमुक्ती आद्य प्रणेती पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
अपूर्ण कार्य ते करण्या तू,
नारी शोषण संपविण्या तू,
होऊन ये धगधगती ज्वाला,
जन्म नवा घे सावित्री तू,
क्रांतीच्या हाकेने त्या पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

माज.

माज.
का करावी दुनियेची पर्वा दुनिया कावेबाज आहे.
स्वाभिमान ठेव जागा खरा तोच तुझा साज आहे.

का झिजतोस जगासाठी झूटी सारी दुनिया ही
सारीच फुकट्यांची फॊज येथे कष्टांची लाज आहे.

कशासाठी हवा आटापिटा कुणा हवी सत्त्य अहिंसा
प्रत्त्येकास वाटतो आपल्या मनगटाचा नाज आहे.

मिरवू नकोस जुनी ती महती संस्कृती परंपरांची
चालही वेश्येची आता येथे वाटते घरंदाज आहे.

भाषणे मोठी लोकशाहीची पेरणी आश्वासनांची
बोलणे एक कृती एक आला सत्तेचा माज आहे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

बुधवार, २२ जून, २०११

स्मृती त्या.

स्मृती त्या.
वृक्ष तरू लता जेंव्हा या यॊवनात आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

आली चॆत्रपालवी जेंव्हा फुलवीत सृष्टी,
ओघळले निर्झर जेंव्हा खळाळत्या कंठी,

गीतांच्या त्या सुंदर ओळी ओठांवरी आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

भटकलो माळावरी स्वच्छंदी खूणेच्या मंदिरी,
चिंबवले जेव्हा बेछूट तुफानी या धारांनी,

स्पर्शाच्या बेभान त्या स्मृती अनावर झाल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

भुललो जेंव्हा त्या सॊंदर्यास या ताटव्याच्या,
मती गुंग झाली सुगंधाने त्या फुलांच्या.

काटयांनी अवचित जखमा बंबाळ केल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

बदल.

बदल.
उपकार केलेले सारे,विसराया लागले.
काय असे घडले?मला घाबराया लागले.

हा जवानीचा बहर,नजरेतली आव्हाने ती,
सगळेच कसे माझ्यावरी,मराया लागले.

उभारल्या कमानी,घातल्या होत्या पायघड्या,
बघताच त्यांना,सारे का कतराया लागले?

होऊनी दीनांचे कॆवारी,सत्तेवरी जे बॆसले,
येताच संधी,खिसे स्वत:चे भराया लागले.

लबाड लांडग्यांची फॊज,आता जमली तेथे,
फुटता बिंग,एकमेका सावराया लागले.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

कळेना.

कळेना.
होतो कोणत्या ठिकाणी,आलो कुठे कळेना,
कोणता मार्ग खरा,काहीच कसे कळेना.

होतो सरळमार्गी,कटू बोलणे कधी न आले,
अर्वाच्या भाषा ही,ओठांवर कशी कळेना.

आदर्श कुणाचा होतो,म्हणती परोपकारी,
पुकारतात आज तेच,चोर का कळेना.

नांदणार होती संगे,सातजन्मे सुखाने,
नजरेत त्याच तुझ्या,अंगार का कळेना.

कालचे ते जग खरे,की आजचे कळेना,
ढोंगी जगात या,मी गुन्हेगार का कळेना.
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

शनिवार, १८ जून, २०११

शेवट.

शेवट.
खेळात या जगाच्या
खेळणे होत गेलो.
जेथे तेथे जीवनी
बर्बाद होत गेलो.
होण्या फूल कळीचे
जगण्याचे सार्थक.
झालो न फुल येथे,
काटेच होत गेलो.
बनविण्या स्वर्ग तेथे,
रक्त माझे शिंपले.
झाला न स्वर्ग तेथे,
नरका मीच गेलो.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

स्मृती.

स्मृती.
आयुष्याच्या संध्याकाळी,
असाच एक निवांत क्षण,
जीर्ण शरीर आराम खुर्चीत पहुडलेलं,
डोळ्यावर चष्मा,हातात वर्तमानपत्र...
डोळे मिटता मिटता,चाळवल्या जातील,
गतकाळातील स्मृती...
काही सुखद...काही नकोशा...
त्यातच आठवेल,तुझा सुंदर चेहरा!
हळूच चाळवतील,हव्या हव्याशा,
त्या सुखद आठवणी...
उत्कट भेटी,जीवघेणी हुरहुर,
ओल्या शपथा,हळवे रूसवे फुगवे,
आठवेल तो ही क्षण...
वियोगाचा!
ओघळतील चष्म्याच्या काचांवर,
नकोशा स्मृतींचे अश्रू!
जाणवेल जीवघेणा,
एकटेपणा!
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

ससा.

ससा.
आज मी जगाला, दिसतो असा आहे.
समजून घ्याल का कुणी? खरचं मी कसा आहे.
सांगायचे जगाला, मला खूप आहे,
ओठांवर शब्द आहे,पण कोरडा हा घसा आहे.
डावपेच येतात खूप, कपटनीतीही जाणतो,
सत्त्यमेव जयते परंतु,माझा घोषा आहे.
अन्यायाचा सूड घेण्या,स्फुरतात बाहू माझे,
ते अहिंसेचे व्रत माझे,परंतु वसा आहे.
जानती हे सारे,मनाने असूनी वाघ मी,
वॄत्तीने मात्र गरीब ससा आहे,ससा आहे.
प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!

बुधवार, १५ जून, २०११

कळलेच नाही.

कळलेच नाही.
मोहात तुझ्या मी कसा फसलो कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
आयुष्य होते वाळवंट,
काटेकुटे सोबती माझे,
रानात काटेरी,फुले फुलली कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
नको ती मनाची बेचॆनी,
अन हुरहुर जीवघेणी,
विश्वात माझ्या,तू गुंतली कधी कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
वाटत होतं जगणं बिकट,
व्यर्थ भासत होती स्वप्ने,
स्वप्नांच्या दुनियेत,सत्त्य उतरले कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

शनिवार, ११ जून, २०११

लक्षात घे!

लक्षात घे!

अत्तराच्या कुपीमधेच,
वेळी अवेळी कामाला यावे म्हणून...
विष ठेवण्याची तुझी कल्पना!
.........फारच आवडली!
फक्त आवडली नाही....
तुझी मनिषा....
जमलंच नाही जर,
सुगंध पसरवणे तर...
कालवायचे विष!
पण लक्षात घे.....
अगं स्नेहभरल्या नजरेने..
तिरस्कारही बदलतो प्रेमात!
मग तुझ्याकडील विषाचे...
अमृत व्हायचं का थांबणार आहे?
प्रल्हाद दुधाळ.

काय बिघड्णार?

काय बिघड्णार?

एकटाच मी असा
त्याने काय फरक पडणार?
जगरहाटी अशीच
तर वेगळे काय घडणार?
जातायेता रस्त्यावर
दिसतात पिंकदाण्या या,
माझ्या या पिचकारीने
आकाश का कोसळणार?
कचरयामधे सारा
बुडून गेला गाव,
मुठभर माझी भर,
याने काय बिघड्णार?
सगळ्यांनाच आता
कष्टाची वाटते लाज,
माझ्या इमानदारीने
काय नवे मिळणार?
विचाराने स्वार्थी
आता होणार आहे घात,
माणासाचा जन्म
लाजीरवाणा का ठरणार?
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, १० जून, २०११

जगण्यास्तव.

जगण्यास्तव.
आता नका विचारू हो,माझी कुणी खुशाली!
स्वप्ने सारी पाहीली,मृगजळे की निघाली!

आलास तू रे जीवनी,आली नवी उभारी,
समजले मी मला,सगळ्यात भाग्यशाली!

तुझ्या भुलले रे स्वप्नांना,नवजीवनाच्या.
जाळून मला गेल्या,त्या क्रांतीच्या मशाली!

नव्हताच तू रे दोषी,का दोष तुला लाऊ,
माझेच दॆव खोटे,ही वेळ आज आली!

लुटतोय कोण येथे,कोणी देतोय गाळी,
जगण्यास्तव विकते,ओठांवरील लाली!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!

खेळ सावल्यांचा.

खेळ सावल्यांचा.


केसातल्या जुईला गंध यॊवनाचा,
आरक्त गाल तुझे की रंग गुलाबाचा!


डोळ्यातल्या लज्जेस,साज जिव्हाळ्याचा,
भाळी कुंकूम तुझ्या,की चांद पुनवेचा!


मॊनातल्या त्या स्मितास,अर्थ गुढतेचा,
नजरेतल्या तीरांना,का हार हा फुलांचा?


चालण्यातल्या लयीला,ताल ठुमक्याचा,
वास्तवातले हे भाव की खेळ सावल्यांचा?


प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.......काही असे काही तसे!

बुधवार, ८ जून, २०११

मोती.

मोती.

दुर्मिळ मोती शोधण्याच्या उद्देशाने,
वाळूमधे शिंपली वेचलीत खूप!

त्या वेड्या वयातच समजलं एक सत्त्य,
सगळ्याच शिंपल्यात मोती नसतात,
आपल्याला भेटतात ती फक्त शिंपली!

कालपरत्वे.......
ते मोती शोधण्याचं वेड आणि वय निघून गेलं!

अनपेक्षितपणे,आज.........
हातात आली
दोन शिंपली
आणि हो........
त्यात मोतीसुद्धा आहेत,
तुझ्या तेजस्वी धुंद डोळ्यांचे!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!

रविवार, ५ जून, २०११

गमती गमतीत

गमती गमतीत.एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
........काही असे काही तसे!मंगळवार, ३१ मे, २०११

शून्य!

शून्य!
आयुष्यातल्या निसरड्या क्षणी,
मला सावरलस,आधार दिलास.
जे क्षण मला पोहचवू शकले असते,
विनाशाच्या खाईत!
तू भेटलास,हात दिलास,
ज्या क्षणी....
माझं जीवन मी संपवलं....
आणि सुरू झालं,
आपलं जीवन!
जे तुझही आहे,माझही आहे.
तू आणि मी,
आता वेगळे कुठे आहोत?
तुझ्यातून मी,आणि माझ्यातून तू वजा जाता,
उरते फक्त ’शुन्य’
ऒदास्याचं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

रविवार, २९ मे, २०११

तुझ्यामुळे!

तुझ्यामुळे!
तुझे दर्शन झाल्यापासून,
मी निसर्गसॊंदर्य पहायचंच सोडून दिलय!
तुझ्या स्नेहात चिंब भिजल्यापासून,
पावसात हिंडणच सोडून दिलय!
तुझ्या नयनातील शराब प्यायल्यापासून,
मी ’पीणं’ च सोडून दिलय!
आणि खरं सांगू?
तुझ्यावर मरायला लागल्यापासून,
मी जगणंच सोडून दिलय!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
..........काही असे काही तसे!

हे असचं!

हे असचं!
हे असच चालायचं?
डोळे झाकून राहायचं?
पोटासाठी जगायच,
कर्जबाजारी व्हायचं,
केवळ दोन घासासाठी?
दोन ग्लास ढोसायचे,
बायकामुलांना तुडवायचं,
कर्जबाजारी व्हायचं,
स्वत:वरच चिडायचं,
मरणासाठी धडपडायचं,
वास्तव नाकारण्यासाठी?
हे असचं चालायचं,
फक्त बघत रहायचं?
अगतिकपणे गप्प बसायचं,
जमेल तसं जगायच,
सोसत रहायच,
मरणापर्यंत!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
......काही असे काही तसे!

शुक्रवार, २७ मे, २०११

आयुष्याच्या मध्यान्ही!

आयुष्याच्या मध्यान्ही!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
बालपण तरूणपण,उधळलेले बेभान क्षण!
आणाभाका खोट्या शपथा,मोडलेलं कुणाचं मन!
हिशोबाचं बाड आता, चाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
जोडलेली मनं,तोडलेली नाती,
मनातली भीती,कटवलेली खाती!
सभ्यतेचं झापड आता,ढळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
आयुष्याची वणवण,पॆशांची चणचण,
खोटं खोटं वागणं,मुर्दाडाचं जगणं!
भविष्यातलं चुकणं आता,टाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
भोगलेलं जगणं,सोसलेलं दुखणं,
दाबलेलं रडणं,भंगलेलं स्वप्न!
डोळ्यातलं पाणी आता,गळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

सोमवार, २३ मे, २०११

सावरलो कसा?

सावरलो कसा?

विचार मनात आहे जगलो कसा मी?
आजवरच्या आयुष्यात वागलो कसा मी?

वाहिला जसा वारा फिरवत पाठ आलो,
ध्येय्याकडॆ चालताना तगलो कसा मी?

बोललो असा की शब्द वावगा नाही,
सांभाळताना मने टिकलो कसा मी?

क्षण मोहाचे होते निसरडी वाट होती,
विस्मय हाच असा सावरलो कसा मी?

प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

समजूत.

समजूत.

सखा माझा तो जरी दूर होता.
साथीला त्याचा गोड सूर होता.

वाटले कितिदा तू मजसवे असावे,
ठावे मजला की तू मजबूर होता.

किस्से कहाण्या त्या पळपूटेपणाच्या,
आहेत पुरावे, तू खरा शुर होता.

किती आणला कोरडॆपणाचा आव,
डोळ्यात दाटलेला अश्रूंचा पूर होता.

प्रल्हाद दुधाळ.
.........काही असे काही तसे!

मन.

मन.
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
बालपणात रमते,मातीत खेळते,
हुंदाडते रानोवनी,पदर आईचा धरते,
गुरूजींची खाते छडी,कोलांट उडी मारते,
कधी असे छतावर,जमीन पोपडी काढते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
आठवणींत रमते,सोनपंखी तरूणपण ते,
हुंडारते बागेमधे,सुरपारंब्या खेळते,
डोंगरात झ-याखाली,बेभान डुंबते,
मित्रमॆत्रिणींच्या संगे,फुलपाखरू उडते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
सुंदरशा स्वप्नामधे,कधी प्रेमगाणे गाते,
मोरपंखी रंगांमधे, उखाणे लिहीते,
अचानक काढी ओरखाडे नको नकोते,
भळभळते जखम,दुखणे नकोते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
संसारातील गमतीत,रमते गमते,
एका एका स्वप्नासाठी शिकस्त करते,
क्षणोक्षणीच्या सुखाची उजळणी होते,
भरे आनंदाने उर,नव्याने उमेद जागते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

अगतिक.

अगतिक.

तुझे जिंकणे आता माझीच जीत आहे.
माझे हारणे आता तुझीच जीत आहे.

चाल माझीच अन शब्द माझाच आहे,
गुणगुणते मनी माझेच गीत आहे.

सांगू नको कुणा गुपीत हे मनीचे,
मुखड्यावरी केली वेडी ही प्रीत आहे.

तुझे तोंड वेंगाडणे ते आगमनाला,
अतिथी देवो भव जुनीच रीत आहे.

भलत्याच माणसांची गाठ रोज आहे,
जाणुनही गातोय हे स्वागतगीत आहे.

प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

शनिवार, २१ मे, २०११

रे माणसा!

रे माणसा!
काय तुझी ही जिंदगी रे माणसा!
वागणे पशूहुनी हीन रे माणसा!
स्वकियांचे स्वार्थात कापतो गळे,
स्वत:साठी किती जगतो रे माणसा!
येताना उघडा जाणार तसाच रे तू,
भरजरी वस्रांसाठी वेडा रे माणसा!
भरण्यास खळी पोटाची एक मूठ पुरी,
हपापला भरण्या तिजोरी किती रे माणसा!
ना बदलती ललाटरेषा नियतीने रेखल्या,
बदलण्य़ास प्रारब्ध किती लढा रे माणसा!
सुख-दुख:ची कळली नाही कधीच सीमा,
नाही समजले हे जगणे तुला रे माणसा!
समजुन घे एकदा शहाणपणा येथला,
वारशात फक्त उरते हे नाव रे माणसा!
प्रल्हाद दुधाळ.
9423012020

डौल!

डौल!
मोल घामा्चे आता
मातीमोल येथे!
चाले पुंजीपतींचाच
डाम डौल येथे!
उघड्यावरी राही
तो श्रम पुजारी,
घरावर बड्या
सोन्याचा कौल येथे!
अन्यायास त्या
नाहीच कोणी वाली,
आक्रोश वांझ त्यांचा
झाला फोल येथे!
प्रल्हाद दुधाळ.

नजरा !

नजरा !

अशा विखारी इथे झोंबल्या त्या नजरा !
हेरती नारी आल्या गेल्या त्या नजरा !

बरे वाटे रहाणे जंगलात श्वापदांच्या,
शिसारी आणती भुकेल्या त्या नजरा !

जाहले कठिण रस्त्यात चालणे आता,
पाठलाग करती लाळगेल्या त्या नजरा !

जरासे कुठे मुक्त वागणे झाले न झाले,
सलगीची भाषा ती बोलल्या त्या नजरा !

दुनियेत खुलेआम आता कसे घडते सारे ?
का न सज्जनांच्या झुकल्या त्या नजरा ?
प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, २९ मार्च, २०११

एक रिकामी फ्रेम!

एक रिकामी फ्रेम!
माझ्या दिवा-स्वप्नातले घर.....
घराचा भला मोठा दिवाणखाना....
दिवाणखान्याच्या भिंतीवर......
लावली आहे एक आकर्षक पण.. रिकामी फ्रेम......
या फ्रेम मधे काय लावू बरं? ...
लावावा का फोटो स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या एखाद्या नरविराचा?
का लावावा आजच्या सत्ताधिशाचा?
पण नकोच!
लावावा तेथे फोटो....
स्वतंत्र भारतात- आत्महत्या कराव्या लागलेल्या एका कर्जबाजारी बळीराजाचा?
पण त्याने काय होणार?
त्यापेक्षा ही फ्रेम रिकामीच ठेवावी!
कधीतरी त्यात लावता येईल फोटो.....
स्री-भ्रूणहत्त्येत सामील एखाद्या पांढरपेशा नराधमाचा!......अथवा.....
माणूसकीला काळीमा फासून......
अगतिक माणसाच्या अवयवांची तस्करी करणा-या- क्रुरकर्म्याचा!
या फ्रेम मधे रंग भरीन म्हणतो..... गद्दार देशद्रोहींच्या रक्ताचा! ....
पण मी एक सामान्य नागरिक!
प्रत्यक्षात- फार तर फोटो लाविन तेथे...
त्या निर्मिकाचा....आणि...करेन पुजा मनोभावे....
देवा सर्वांना चांगली बुदधी दे! मला मात्र सुखात ठेव!!
-प्रल्हाद दुधाळ.
9423012020.

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

सवाल!

सवाल!
माझा तयांना एकच हा सवाल होता!
झालात एवढे कसे मालामाल होता?
काय झाले घेतल्या त्या आणा-भाकांचे?
मी कुठे मागितला ताजमहाल होता?
जीवन व्हावे गाणे फक्त होती मनिषा,
बेसुर झाले जीणे, सूर ना ताल होता!
माणसांनी तेथल्या पाहिली काही स्वप्ने,
विश्वासून जीव केला तो बहाल होता!
धर्म जाती च्या नावाने डोकी जी फोड्ली,
रंग रक्ताचा तो हिरवा का लाल होता?
प्रल्हाद दुधाळ.