शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

पती म्हणजेच परमेश्वर?

पती म्हणजेच परमेश्वर?

संसारगाड्याची या चाके ती दोन 

पळायला हवीच की भराभर
विचार आता हवे बदलायला
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

तिने सांभाळायचे चूल नी मूल
राबायाचे त्याने फक्त घराबाहेर
स्वयंपाक बघावा त्याने रांधून
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

शिकलेला तो याचंच का कौतुक
आहे तीही हुशार पदवीधर
तिलाही संधी देवून बघूया की
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

नवरा बायको पातळी एकच
महिलाही आहे कामसू जबर
पुरे पुरूषाचा उदो उदो आता
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

बदलत्या काळाची ओळखू भाषा
एकमेकाना सारखाच की आदर
दोघांची नक्कीच जबाबदारी घर
नाही पती म्हणजेच परमेश्वर!
......प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा