बुधवार, ८ मार्च, २०१७

आनंद ...

आनंद ........
शहाण्यास असे
शब्दांचाच मार
इथे वेडे ठार
काय करू ?
गाढवाच्या पुढे
व्यर्थ ते किर्तन
लाथांचे वर्तन
सुटेना हो!
काळाचे औषध
झाले कुचकामी
उपायही नामी
अपयशी!
माणसांशी आता
वागावे हो कसे
पडतात फासे
उलटेच!
सोसाट्याचा वारा
भरकटे दिशा
दाटते निराशा
कधी कधी!
अचानक येते
उर्जेची तिरीप
अंधूकसा दिप
दिसतसे!
अंधारा नंतर
येतोच प्रकाश
आनंदी दिवस
उगवतो!
झालो आता मुक्त
सुटले ते बंध
अवघा आनंद
आता येथे!
 ..... प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा