शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

वस्ती ती ...

वस्ती ती ...
होती ती गरीबांची वस्ती 
मने परंतु ती श्रीमंत होती.
छप्पर गळके ते कौलांचे 
तुटक्या पत्र्यांच्या तेथे भिंती.
रस्ते कैसे फुटभर गल्ल्या
रक्तापेक्षा माणुसकी नाती.
जातधर्माचे नव्हते कुंपण
सुखदु:खाचे सगे सोबती.
दिवाळी इद ख्रिसमस तेथे
धडाक्यात सजत गणपती.
निळे श्वेत वा हिरवे भगवे
झेंडे सारे एकत्र नाचती.
जयंती बाबांची बुध्द पोर्णिमा
असो पाडवा वा शिवजयंती.
गोडधोडाने होई साजरी
आगळे वेगळी एकी होती.
शिकले आता शहाणे सारे
बांधल्या धर्म जातीच्या भिंती.
पक्की आता घरेही तेथली
दुरावली पण माणुसकीची नाती.
आठविता मन विषण्ण होते
दिसता ती मुर्दाडांची वस्ती .
.(c)....प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा