शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंता नको.

चिंता नको!

उद्याच्या चिंतेने
आज हा ग्रासला
जीव तो त्रासला
निराशेने.
काळजी उद्याची
करता का उगा
खुशीत हे जगा
क्षण हाती.
बदलत नाही
जे आहे घडणे
त्यात हे लोढणे
चिंतेचे का?
सुख असो दु:ख
जावू त्या सामोरे
करू त्या साजरे
खुशी खुशी.
     .... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, १८ जुलै, २०१६

श्रावण मास

श्रावण मास.

नेसून हिरवा शालू
उभी सृष्टी स्वागताला
गाणे गाती पशू पक्षी
आला हा  श्रावण आला

सरसर सर येते
आता गेला आता आला
 उन पाउस खेळत
आला हा श्रावण आला

रानात झरे वाहती  
फुलांना गंध नवेला
निसर्ग हिरवा ओला
आला हा श्रावण आला

महिना सणासुदीचा
उत्साह मनी दाटला
गोडधोडाच्या पंगती
आला हा श्रावण आला

श्रावनोत्सव रंगला
नाही अंत उत्साहाला
उर्जा मानवी मनाला
आला हा  श्रावण आला
     ..... प्रल्हाद दुधाळ .

सोमवार, ४ जुलै, २०१६

वारी वारी

वारी वारी 

ओढ विठ्ठलाची 
संताना लागली 
वारी सुरू झाली 
पंढरीची .

आकूर्डीत आज 
भजनाचा ठेका 
निघालाहे तुका 
पंढरीला.

आजोळी रमला 
आळंदीचा राणा 
गातात भजना 
भक्तजन.

पुण्यनगरीत 
संतजन आले 
भक्तीमय झाले 
पुणेकर .

भजन किर्तन 
ठेक्यात रंगले 
नामात दंगले 
भक्त सारे.

दोन दिवसांचा
वैष्णवांचा मेळा 
रंगतो सोहळा 
गल्लोगल्ली.

वैष्णवांचा मेळा 
रस्त्यांवर आला 
गर्जत चालला 
नाम घोष.

दिव्याच्या घाटात 
दिंड्या पाठोपाठ 
सोपी केली वाट 
पंढरीची

दिंड्या पताकानी 
रस्ता हा फुलला 
ज्ञानोबा चालला 
सासवडी.

ज्ञानयांचा राजा 
सोपानाच्या भेटी 
वैष्णवांची दाटी 
कऱ्हेकाठी.

टाळमृदंगाच्या 
तालात नाचती 
तल्लीन ते होती 
भजनात.

सोपानदेवांची 
पालखी सजली 
वारी ही निघाली 
निरेकडे.

पंढरी वाटेत 
सोन्याची जेजूरी 
विसावली वारी 
गडापाशी.

सदानंदाचा तो 
गर्जे यळकोट 
संगे हरीपाठ 
पांडूरंग.

माऊली माऊली 
मार्तण्ड मल्हारी 
वाजे एकतारी 
साथ साथ.

वाल्मिकीच्या गावा 
ज्ञानदेव आले 
उल्हासीत झाले 
वाल्हेकर.

रामायणकर्ते 
पांडूरंगासंगे 
किर्तन हे रंगे 
दिनरात.

वाजत गाजत 
प्रदक्षिणा केली 
भक्तीमय झाली 
वाडी वस्ती.

नीरा घाटावर
माऊलींचे स्नान
विसरले भान
वारकरी.

जंगी ते स्वागत
पाडेगावी झाले
स्नेहात नहाले
वैष्णव हे.

लोणंद मुक्कामी
भजन कीर्तन
आनंदले मन
श्रवणाने.

लागला हा ठेका 
टाळ मृदंगाचा 
लिंब चांदोबाचा 
उत्साहात .

माऊली माऊली 
अश्व पुजियला 
थाटात धावला 
ऱिंगणात.

तरडगावात 
तळ हा पडला 
जयघोष झाला 
विठ्ठलाचा.

ज्ञानोबा माऊली 
पांडूरंग हरी
गर्जते नगरी
फलटण.

विमानतळास
यात्रेचे स्वरूप
पांडूरंगरूप
त्याशी आले.

पालखी चालली
पंढरपूर गावा
घेताहे विसावा
बरडला. 

नात्यापुत्यामधे
विसावले संत 
हिरवाई शांत 
सोबतीला.

सदाशिवपुरी 
रिंगण सोहळा 
धूळ ती कपाळा
लावती ते.

माळसिरसात 
भिजले नामात
चिंब पावसात 
वारकरी.

खुडूसला रंगे 
माऊली रिंगण
हरपले भान 
वारकरी.

झिम्मा नी फुगडी 
रमली माऊली 
वेळापुरी झाली 
पंगत ती.

उघडेवाडीत
उत्सव रंगले 
टप्प्यात भेटले 
सोपानास.
.
जाहला गजर 
टाळ मृदंगाचा 
माऊलीं नामाचा 
वाखरीत.

उभे आणि गोल 
रिंगण रंगले 
अश्व ते दौडले 
डौलामधे.

ज्ञानोबा तुकोबा 
सोपाना संगती 
उड्या त्या खेळती 
वारकरी.

संतजन सारे 
पंढरीत आले 
गर्दीने फुलले 
भिमा तीर.

जमले वैष्णव 
पांडूरंगा भेटी 
दर्शनाच्या साठी 
रांग मोठी.

संतांच्या भेटीने 
दाटला आनंद 
आगळे हे बंध 
विठ्ठलाशी.

चंद्रभागेतीरी 
रंगला सोहळा
जगात वेगळा 
उत्सव हा.

कानडा विठ्ठल 
पंढरीचा राणा 
सोडून मी पणा 
लीन तेथे.

मुखी हरी नाम
विठू रखमाई 
वाट सोपी होई 
संसाराची.

एकादशी आज 
उपवास केला 
प्रसाद अर्पिला 
मनोभावे.

वारीतून आलो 
त्याच्या दर्शनाला 
सार्थ जन्म झाला 
मानवाचा.

मुखात विठ्ठल 
कामात विठ्ठल
जीवन विठ्ठल 
पांडूरंगा.

पांडूरंग हरी! वासुदेव हरी !

---प्रल्हाद दुधाळ.



रविवार, ३ जुलै, २०१६

पावसाने

पावसाने ...
आज या पावसाने
लावली भुरभुर
नेली ना छत्री कोट
लागते हुरहुर.

पाऊस आला आता
रस्ते ते निसरडे
हातात धर हात
घसरशील गडे.

पडावा तो जोरात
रस्त्यात पाणी पाणी
आधाराने चालावे
 म्हणत ओली गाणी,
        प्रल्हाद दुधाळ.