बुधवार, १५ जून, २०११
कळलेच नाही.
मोहात तुझ्या मी कसा फसलो कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
आयुष्य होते वाळवंट,
काटेकुटे सोबती माझे,
रानात काटेरी,फुले फुलली कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
नको ती मनाची बेचॆनी,
अन हुरहुर जीवघेणी,
विश्वात माझ्या,तू गुंतली कधी कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
वाटत होतं जगणं बिकट,
व्यर्थ भासत होती स्वप्ने,
स्वप्नांच्या दुनियेत,सत्त्य उतरले कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!
शनिवार, ११ जून, २०११
लक्षात घे!
अत्तराच्या कुपीमधेच,
वेळी अवेळी कामाला यावे म्हणून...
विष ठेवण्याची तुझी कल्पना!
.........फारच आवडली!
फक्त आवडली नाही....
तुझी मनिषा....
जमलंच नाही जर,
सुगंध पसरवणे तर...
कालवायचे विष!
पण लक्षात घे.....
अगं स्नेहभरल्या नजरेने..
तिरस्कारही बदलतो प्रेमात!
मग तुझ्याकडील विषाचे...
अमृत व्हायचं का थांबणार आहे?
प्रल्हाद दुधाळ.
काय बिघड्णार?
एकटाच मी असा
त्याने काय फरक पडणार?
जगरहाटी अशीच
तर वेगळे काय घडणार?
जातायेता रस्त्यावर
दिसतात पिंकदाण्या या,
माझ्या या पिचकारीने
आकाश का कोसळणार?
कचरयामधे सारा
बुडून गेला गाव,
मुठभर माझी भर,
याने काय बिघड्णार?
सगळ्यांनाच आता
कष्टाची वाटते लाज,
माझ्या इमानदारीने
काय नवे मिळणार?
विचाराने स्वार्थी
आता होणार आहे घात,
माणासाचा जन्म
लाजीरवाणा का ठरणार?
प्रल्हाद दुधाळ.
शुक्रवार, १० जून, २०११
जगण्यास्तव.
आता नका विचारू हो,माझी कुणी खुशाली!
स्वप्ने सारी पाहीली,मृगजळे की निघाली!
आलास तू रे जीवनी,आली नवी उभारी,
समजले मी मला,सगळ्यात भाग्यशाली!
तुझ्या भुलले रे स्वप्नांना,नवजीवनाच्या.
जाळून मला गेल्या,त्या क्रांतीच्या मशाली!
नव्हताच तू रे दोषी,का दोष तुला लाऊ,
माझेच दॆव खोटे,ही वेळ आज आली!
लुटतोय कोण येथे,कोणी देतोय गाळी,
जगण्यास्तव विकते,ओठांवरील लाली!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!
खेळ सावल्यांचा.
खेळ सावल्यांचा.
केसातल्या जुईला गंध यॊवनाचा,
आरक्त गाल तुझे की रंग गुलाबाचा!
डोळ्यातल्या लज्जेस,साज जिव्हाळ्याचा,
भाळी कुंकूम तुझ्या,की चांद पुनवेचा!
मॊनातल्या त्या स्मितास,अर्थ गुढतेचा,
नजरेतल्या तीरांना,का हार हा फुलांचा?
चालण्यातल्या लयीला,ताल ठुमक्याचा,
वास्तवातले हे भाव की खेळ सावल्यांचा?
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.......काही असे काही तसे!
बुधवार, ८ जून, २०११
मोती.
दुर्मिळ मोती शोधण्याच्या उद्देशाने,
वाळूमधे शिंपली वेचलीत खूप!
त्या वेड्या वयातच समजलं एक सत्त्य,
सगळ्याच शिंपल्यात मोती नसतात,
आपल्याला भेटतात ती फक्त शिंपली!
कालपरत्वे.......
ते मोती शोधण्याचं वेड आणि वय निघून गेलं!
अनपेक्षितपणे,आज.........
हातात आली
दोन शिंपली
आणि हो........
त्यात मोतीसुद्धा आहेत,
तुझ्या तेजस्वी धुंद डोळ्यांचे!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!
रविवार, ५ जून, २०११
गमती गमतीत
गमती गमतीत.
एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!
तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!
एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!
धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!
एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!
मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!
एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!
एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
........काही असे काही तसे!