गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

केस!

केस!
 
गल्ली गल्लीत,नाक्या नाक्यावर,
पिसाटांचे अड्डे आकारले आहेत!
वखवखलेली नजर अन गुर्मी ,
तोंडात गुटक्याचा तोबरा आणि..
हातात मोबाईल...
अश्लिल मेसेज भरलेला!
लंपट नजर सावज हेरणारी,
नजर भिडताच पाचकळ रिमार्क!
जमलीच तर लगट!
"ती" तर होती
... एक उघड झालेली केस!
दररोज अशा....
कितीतरी केस घडत आहेत!
आभासी रेप तर दररोजच होत आहेत!
रेप तर दररोजच होत आहेत!

अंत.

अंत.
घोटाळ्यांचा देश हीच,
झाली देशाची ओळख!
सूर्य असून आभाळी,
झाला गच्च हा काळोख!
भयाण या काळोखात,
हरवली मानवता!
भर दिवसा उजेडी,
पिसाटांचा नंगानाच!
असे वाटते पांपांचा,
घडा भरून वाहिला!
माणसाच्या या जातीचा,
अंत जवळ तो आला!

     ........प्रल्हाद दुधाळ.
              ९४२३०१२०२०
 

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

आयुष्य.

आयुष्य.
आयुष्य माणसाच,
खरं तर ’पाणी’संथ वाहणारं!
उथळ असेल मार्ग,
खळखळ आवाजात वाजणारं!
असेल जर नागमोडी वाट,
दुडूदुडू करत धावणारं!
तुटला अचानक प्रवाह,
धबधबा होऊन कोसळणारं!
आलाच कुठे अडसर,
शक्यतो मार्ग वेगळा शोधणारं!
मिसळेल ज्यामधे त्याचा,
रंग तसा धारण करणारं!
अडवल तर अडणारं.
संधी मिळाली तर भिडणारं!
आयुष्य माणसाच,
खरं तर ’पाणी’ संथ वाहणारं!
                     प्रल्हाद दुधाळ.
                     ९४२३०१२०२०.

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२

जाणीव!

जाणीव!
वर्षे किती संपली?
दिवस कसे गेले?
आयुष्य इथवरचे,
झगडण्यात गेले!
जे होते माझ्यापाशी,
जाणीव नव्हतीच त्याची,
लालसेत ऎहिकाच्या,
आयुष्य कुढण्यात गेले!
पेलली किती ओझी,
एवढ्या खांद्या वरती,
करण्या सिध्द स्वत:ला,
वय धडपडण्यात गेले!
आज नव्याने पाहतो,
जीवनातले आनंद कण,
मानतो आभार मी,
निर्मिकाचे नियोजन,
नजरेत सुधारल्या,
जाहले, बरे झाले!
आयुष्य इथवरचे,
किती आनंदात गेले!
         प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

ग्लोबल इंडीया!

       ग्लोबल इंडीया!
       मायबाप सरकार, मेहेरबान होणार!
       गरीबांच्या घरात, मोबाईल येणार!
      आता नको काळजी, पोटा पाण्याची,
       टौक टाईम आता,  भरपेट मिळणार!
     मागु नका दानापाणी, झालो ’महासत्ता’,
      लवकरच गावोगावी,वाईनचा गुत्ता देणार!
       आता नका म्हणू ,’गरीब’ भारतात राहतो,
      ’ग्लोबल इंडीया’ च  चांगभलं म्हणणार!
                                        --प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २८ जुलै, २०१२

समतोल!


समतोल!
आयुष्य तुझे घडवणं,
अथवा बिघडवणं,
बहुतांशी आहे तुझ्याच-
हाती!
संकटांची बनवता येते
संधी!
संधीच करता येतं
सोनं!
सोन्याचं जाणायला हवं
मोल!
नात्यांचा आणि
व्यवहाराचा साधायला हवा
समतोल!
जीवन आहे....
अनमोल!
..प्रल्हाद दुधाळ.




रविवार, २२ एप्रिल, २०१२

आवडेल?


आवडेल?
एक फुलझाड
आपल्या मातीत
बहरलेलं!
मी घेतलंय
अलगद काढून
माझ्या बागेत
फुलवायला!
जमेल ना?
नव्या मातीत,
नव्या हवेत
नव्या पाण्यात
रुजवायला?
आवडेल ना
या झाडाला
माझी आवडती बाग
सजवायला?
       प्रल्हाद दुधाळ.