शनिवार, १७ मार्च, २०१८

कलियुग.


कलियुग.

बेफिकीर ते सारे मन्मानी करू लागले
आपल्याच कर्माने जितेजी मरू लागले

जन्मदात्यांचेही आता वाटे ओझे तयांना
स्वार्थांस्तव सांजसकाळी ठोकरू लागले

धैर्यशीलता न अंगी इच्छिले ते मिळाले    
समस्येने इवलाश्याही बावरू लागले

प्रतिष्ठा होती श्रमांना गेली लयास आता
गाळण्यास घामाला भले घाबरू लागले

लाऊन मुखवटा जगती नास्तिकतेचा  
भीतीने नरकाच्या मन पोखरू लागले  

काय ती वर्णावी कलियुगाची कथाव्यथा
जगल्याविनाच आयुष्य हे सरू लागले
..... प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १ मार्च, २०१८

कधी ?

कधी ?
घेतो अाज मोकळा श्वास
खरे हे की केवळ भास?
बहरला वसंत जरी
म्हणती त्या फाल्गुनमास!
जीवानिशी जातोय कोणी
माध्यमां प्रसिद्धीचा ध्यास!
वाममार्गे गच्च तिजोर्या
संपेना तरीही हव्यास!
येणार कधी रामराज्य
संपेल कधी वनवास?
___प्रल्हाद दुधाळ.

बदल....

बदल....

किल्मिषे नात्यांतली त्या होळीत जाळतो मी
सांगतो खरेच आता विसंवाद टाळतो मी

विसरून तेजोभंगा सुरुवात नवी केली
दुखावल्या माणसांना हृदयात माळतो मी

कर्मफळ ज्याचे त्याला मिळणार इथे आहे
जाणीवेने नव्या या जुने पीळ टाळतो मी

जखमा जरी त्या ओल्या घाव विसरलो आहे
वचन दिले आत्म्याला कसोशीने पाळतो मी

प्रतिसाद थंड आहे माझ्या त्या जिवलगांचा
गुन्हा नक्की काय माझा आसू अबोल गाळतो मी
..... प्रल्हाद दुधाळ



बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

निवांत

 निवांत.

चुकलो कधी मी धड्पड्लो कधी!

रस्त्यावर या कितिदा पड्लो कधी!

हार माझीच मजला माहीत होती,

लुटूपुटूची लढाई लढलो कधी!

वाट जरी ती होती विनाशकारक!

हट्टाने मार्गाने त्याच घुसलो कधी!

मामला होता खरा तर तो खुशीचा,

नशिबाच्या नावानेही रडलो कधी!

भेट तुझी माझी तशी झालीच कुठे?

दिवास्वप्नांत वेड्या त्या गढ्लो कधी!

आभाळाचे छ्त हा दगड उशाला,

निवांत असा इथे पहुडलो कधी!

.........प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

आवर....

आवर....
नतमस्तक एकदा बघ होवून
सारा जाईल दुराभिमान गळून

झुकवून बघ एकदा ताठ नजर  
पाषाणालाही मग फुटेल पाझर 

दातांना बघ विसावा देउन
तब्बेत कशी मग जाते सुखावून

सदैव हात असूदे कामात   
समृद्धी आपसुक लोळेल पायात

जिभेवर असावा प्रखर अंकुश
सदैव रहाशील मस्तीत अन खुश

इच्छांना थोडासा घाल आवर  
आनंद तो मग लाभेल आयुष्यभर
          ..... प्रल्हाद दुधाळ    

बुधवार, १० जानेवारी, २०१८

वार्धक्य...

वार्धक्य...
वयाचे दुखणे,बडबड वाढे,
कडूजार काढे,पिणे आले!

व्हावे स्थितप्रज्ञ,खुपसणे नाक,
सवय ही टाक,आता तू रे!

बोल मोजकेच,कशास पाल्हाळ,
गोष्टीचा वेल्हाळ,होवू नको!

अनुभव तुझे,तुझ्याशी रहावे,
विचारले द्यावे,सल्ला मंत्र!

अति तो उत्साह,करतो रे घात
नको तेथे मत,तुझे नको!

तब्बेत जपावी,पचेल ते खावे,
मर्यादेत –हावे,पाळ पथ्य!

वार्धक्य आनंदी, जर वाटे व्हावे,
विचारी वागावे,ध्यानी ठेव!

उमेदीच्या काळी, केलेस तू कष्ट,
आता ऐक स्पष्ट, सांगती ते!

प्रियजनांसाठी, नको अडचण,
घट्ट कर मन, स्वत:साठी!

अंगीकार आता, जप तप ध्यान,
अध्यात्मात मन, रमावे ते!

आयुष्याची नौका,पैलतीरा जावी,
शांततेत गावी,भैरवी ती!
      .... प्रल्हाद दुधाळ    


सोमवार, ८ जानेवारी, २०१८

शिल्पकार...

शिल्पकार...

विचार एकदा रे तुला स्वत:ला,
काय कारण खर तुझ्या दु:खाला?

भूतकाळाचा झालास का गुलाम?
स्वप्नांना तुझ्या घालतोस लगाम!

आले कधी एखाददुसरे विघ्न,
समजायचं का भंगले ते स्वप्न?

माघार घेतो विचारात गुंतून,
समजावणार स्वत:ला निक्षून?

हार-जीत तुझी,जबाबदार तू,
आहेस जीवनाचा शिल्पकार तू!
     ..... प्रल्हाद दुधाळ.