मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाट.

वाट.
आस्मिता कुणाची इथेही भंगली आहे,
लाखोली शिव्यांची ओठी खोळंबली आहे.

उपाशी इथे जरी जवान त्या क्रांतीचे,
महफिल गुलाबी एक रंगली आहे.

नाही आळविले जरी तुकोबाने देवा,
गाथा इंद्रायणीमधे तरंगली आहे.

करिती टवाळी जरी माझ्या कल्पनेची,
कथा माझी वेदनेने ओथंबली आहे.

चालतोय आज इथे मी उंटाच्या चालीने,
बंडास्तव वाट ही अवलंबली आहे.
प्रल्हाद दुधाळ.
...........काही असे काही तसे!

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

माणसे अशी.

माणसे अशी.

अशी काही नको नको ती भेट्तात माणसे.
जगण्यातली मजा ती घालवतात माणसे.

उभा जन्म खाण्यासाठी जगतात माणसे
दात कोरूनही पोट ती भरतात माणसे.

आयुष्य सारे पॆशासाठी वेचतात माणसे
गच्च ती तिजोरी उपाशी मरतात माणसे.

जन्म मानवाचा व्यर्थ दवडतात माणसे
माणुसकीला बदनाम करतात माणसे.

अशा पुंगवांना कसे हो म्हणावे माणसे?
पुरा जन्म पशूसारखे वागतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

विनाकारण.

विनाकारण.
आपणच आपलं जगणं
अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी
विनाकारण भरत असतो!
तोतस्सा ती ’तश्शी’,
विनाकारण बडबडत असतो,
साप साप म्हणून ब-याचदा,
भुईलाच बडवत असतो!
भिती चिंता कटकट वटवट,
करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो,
जगण अवघड करत असतो!
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

नियतीचा गुलाम.

नियतीचा गुलाम.
स्वत:भोवतीच फिरणा-या अवनीवर
जेंव्हा मी फेकलो गेलो तेंव्हा......
लक्षात आलं ...इथे मी एकटाच नाही!
इथेही सगे सोयरे मित्र मॆत्रिणी सारे सारे आहेत!
चिटोरीभर पदवीवर जेव्हा चाकरी मिळेना तेव्हा...
घरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला आणि ....
सांगीतलं एक कटू पण सत्त्य!
पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं तेंव्हा-
पोट्च्या पिलालाही पायाखालीच घ्यावं लागतं... नाईलाजानं!
बागेमधे प्रेयसीने हातातला हात सोडऊन घेत
हळूच जमिनीवर आणलं....
नुसत्या प्रेमावर नाही जगता येत काही!
त्यासाठी लागतो पॆसा! एकवेळ प्रेम नसलं तरी चालतं!
महीनाभर मर मर कष्ट करून जेव्हा पाकीट भरलं तेव्हा...
बायकोनं बजावलं.......
तुमच्या घामावर हे नोटाचे कागद उगवले नसते तर...
.......तर... मी तुम्हाला कधीच स्विकारल नसतं!
.....वॆतागानं मी ओरड्लो......
अरे तू आहेस तरी कोण?
चारही दिशांनी आवाज आला..........
तू गुलाम आहेस!
नियतीचा गुलाम आहेस!
......प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

होळी.

होळी.
साद माझी आर्ततेची ती वा-यावरी उडून गेली
प्रतिसाद नाही मिळाला समजुनी तु रूष्ट झाली.


कथा तुला कथण्याची ती शब्दाविणा राहून गेली
कल्पित एक कथा गुंफित तू मात्र निघून गेली.


होतीस तू बेपर्वा ना फिकिर कुणाची केली
मस्करी अंगाशी आली अन शपथ ती खरी झाली.


क्षणोक्षणी आठवण दाटे जगण्याची चव गेली
सारा डाव मोड्ण्या नियतीने शर्थ उगाची केली.


सहजीवनाची याद सुखाच्या खरेच कधी आली?
विरहाने कायमची जीवनाची माझ्या होळी झाली.
प्रल्हाद दुधाळ.
.....................काही असे काही तसे!

सखे.

सखे.
सखे साथ ही जन्मोजन्मीची
चुकलं माकलं सुधारून घे.

अनुभवातूनच येतं शहाणपण
पाऊल वाकडं सावरून घे.

वागण कधी नसतं वावगं
मागील कारणं जाणून घे.

शंका मनातली नाही बरी
मनातलं खरं विचारून घे.

तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू
जीवनातलं मर्म समजावून घे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

गुलाम.

गुलाम.

संस्कार आणि परंपरांचे त्या
डोक्यावरती मोठे झाले ओझे
पश्चिमेच्या बेफाम वा-यात या
झिंगतोय आम्ही बेभान आहे.

आता फक्त येथे चालते भाषा
कोरड्या शुद्ध या व्यवहाराची
कशास नातीगोती ही सांभाळू
माणुसकी झाली बदनाम आहे.

वाहते ही आता उलटी गंगा
नवसहस्रकाचे वाण आहे
मनामनातली दरी वाढतेय
बाकी सगळ छान छान आहे.

उगवतीच्या सुर्या नेहमीच
सगळ्यांचा सदा सलाम आहे
किती करा वल्गना प्रगतीच्या
माणूस नियतीचा गुलाम आहे.

प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!