मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

कहाण्या.

कहाण्या.
कधी कोरडा दुष्काळ
येतो कधी ओला काळ
वाढे व्याजावर व्याज
दारी सावकारी मागण्या!
होते वांझोटी पेरणी
सारे कधी जाते वाहुनी
पोसावे कसे परिवारा
लेकरांस केविलवाण्या!
पंचनामे ते जीव जाता
मारती ते मोठ्या बाता
मदतीच्या आकड्यांच्या
मिळती खोट्या बतावण्या!
किती संसार ते गांजले
रोजचेच हे रडे झाले
झाडा झाडाला विचारा
आत्महत्येच्या कहाण्या!
     .....प्रल्हाद दुधाळ.


शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

प्रेमभावना

प्रेमभावना.
स्मरण क्षणोक्षणी,हीच माझी साधना,
राहो  साथ सदैव,ही प्रभुशी प्रार्थना!
बोल सखे बोल,मनातले ते सगळे,
कशासाठी हवी ती वेगळी प्रस्तावना?
भोग कधी चुकले का कुणा प्राक्तनाचे?
उगा का करावी  कुणाची ती संभावना!
गुंफले असे हात, हातात आपले की,
स्मितात या सुखाच्या,हरवल्या वेदना!
उरते कुठे आस्तित्व वेगळे तुझे माझे?
अंकुरता अशी  ह्रदयी प्रेमभावना!
    .......प्रल्हाद दुधाळ.14/02/2014.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

माझ्या मना!

माझ्या मना!
नको सांगू बहाणा,
पुसतो पुन्हा पुन्हा,
जाहला काय गुन्हा,
अबोल माझ्या मना!

रात्रंदिनी फिरशी
नाहीच तू थाऱ्याशी
एकदा बोल पुन्हा
अबोल माझ्या मना!

 भविष्य कधी भूत
 जगणे भीत भीत
 शंका सदैव नाना
 अबोल माझ्या मना!

 करू नाही विचार
 देतो तनी विकार
 नको ची ही भावना
 अबोल माझ्या मना!

 वागणे नाही बरे
 एकदा जाण खरे
 माझ्या मन मोहना
 अबोल माझ्या मना!
    ....प्रल्हाद दुधाळ.पुणे.
     

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

घोळ.

  घोळ
म्हणतात असं
गोष्टीची प्रत्येक
असे एक वेळ.
त्यावेळी वेळीच
साधायला हवा  
अचूक तो मेळ.
पस्तावणे हाती
निसटल्यानंतर
तो क्षण ती वेळ.
बसलो घालत
नुसताच घोळ
जीवनाचा खेळ!

.....प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

नको ग!

     नको ग!
शब्दांना इतकी धार नको ग!
असे जिव्हारी वार नको ग!
बोल बोल मनातले सारे,  
उगाच असा भार नको ग!
सारे विसरू रुसवे फुगवे,
प्रेमात व्यवहार नको ग!
रोखठोक मामला असावा,
मिटवू तो उधार नको ग!
होती शपथ जन्मोजन्मीची,
अर्ध्यातून माघार नको ग!
सुटे संवादातून समस्या,  
राग तुझ्यावर स्वार नको ग!
साकारले रेखाटले स्वप्न,
वेठीला घरदार नको ग!
            ....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

हे कविते...

.....हे कविते...
हे कविते...
तू माझा शब्द ...
तू माझी प्रेरणा...
तू मनातली भावना...
तू माझे जीवनगाणे...
तू देते जगण्याचे बहाणे...
तू माझी वेदना वा आनंद...
तू माझा जीवापाड जपलेला छंद...
तू आधार मम जीवनाचा....
तू श्वास,प्राणवायू माझा....
उरेल केवळ निर्जीव कलेवर...
जीवनातून या तुला वजा केल्यावर!
             .....प्रल्हाद दुधाळ.


...तुला वजा केल्यावर....

.....तुला वजा केल्यावर....
उमजत नाही,समजत नाही,
असेल कसा तो भविष्यकाळ?
पुढ्यात काय असेल वाढलेले,
तुटली जर वर्तमानाशी नाळ?
अजुनही होते हे मन कातर,
आठवता भेट पहिली वहिली!
 सात जन्माच्या शपथा हळव्या,
 झालेली वाट एक ही आपुली!
 संसारवेल बहरली फुललेली,
अन स्वप्ने सगळी साकारलेली!
आठवते आयुष्याच्या सायंकाली,
सुख दु:खातली वाट चाललेली!
भयभीत मी, होईल काय माझे,
अर्ध्यावरती साथ सुटल्यावर?
असेल कसले जीवन सखये,
माझ्यातुन तुला वजा केल्यावर?
        ....प्रल्हाद दुधाळ.