शुक्रवार, ३० जून, २०१७

कर्मफळे ..

कर्मफळे ..
पाण्यात आपण किती कळे ज्याचे त्याला 
फळ आपल्या कर्माचे मिळे ज्याचे त्याला! 
दवंडी साळसूद पिटतो जो तो इथे 
बुडाखाली जे जळे आकळे ज्याचे त्याला!
मुखवट्याआड चेहरे नराधमांचे
वास्तव अंतरातले छळे ज्याचे त्याला!
चाल प्रल्हादा ठरवलेल्या मार्गाने
पेरले जे त्याची कर्मफळे ज्याचे त्याला!
.... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २६ जून, २०१७

मजसवे ...

मजसवे ...
धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

सांजवेळ अशी तुझ्याविना उदास ती!
बरसते डोळ्यातून आसवधार ही !!
कातरवेळी या अशा नव्याने रे भेटावा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

दुरदेशी गेलास नी उदास मी इथे!
शोधते खुणा त्या आठवांच्या कुठे कुठे!!
घुमतो सदा इथे प्रितीचा हा पारवा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

क्षण विरहाचे एक दिन विरतील !
भेट होता एकदा भेद ते मिटतील!!
 तमातही दिसतो आशेचा हा काजवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!
     ...... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, १९ जून, २०१७

मागणे....

मागणे...
उत्तरे मिळाली
 कालच्या प्रश्नांची ,
आज प्रश्न उभे
वेगळेच होते!
सोडविले गुंते
किती मी आयुष्या.
रोजची आव्हाने
नवे पेच होते!
मायेची भुरळ
जयांनी घातली,
घात करणारे
 पुन्हा तेच होते!
झालो ना शहाणा
 ठोकरा खाऊन,
मिळाले ते पुन्हा
 फटकेच होते!
आता देवा नाही
 मागणार काही,
घडणे पडणे
 कर्मानेच होते!
अनुभवानेच
शिकवावा धडा
जीवना मागणे
सदा हेच होते!
    ... प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, ३१ मे, २०१७

सुख

सुख...
माणसाशी माझ्यातल्या
कित्येकदा मी भांडतो...
माणूसकी कशी फोल
कैफियत ही मांडतो...
यत्न किती केले त्यांनी
खोटेपण रूजवाया ...
विवेकाने दिला दगा
कष्ट त्यांचे गेले वाया...
महात्म्याच्या मर्कटांनी
केले योग्य ते संस्कार...
केले नाही ते वावगे
आला अंगी सदाचार...
जर आहे मती ठाम
मनी ये ना कुविचार...
पारदर्शी वागण्याने
सुख जीवा मिळे फार...
     .... प्रल्हाद दुधाळ .

मंगळवार, ३० मे, २०१७

जाणीव

जाणीव.

जीवनात खोटे
वागणे बोलणे
नरकाचे जीणे
याच जन्मी.
आत नी बाहेर
निर्मळ स्वभाव
ब्रम्हांडात नाव
होते त्याचे.
जरी जग सारे
वाटे बिघडले
ज्याचा त्याला सले
गुन्हा मनी.
ध्यानात हे ठेवा
पहातो तो आहे
नोंद होते आहे
कुकर्मांची.
आयुष्य मोलाचे
आनंदाने जगू
विवेकाला जागू
सदैवच.
.... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २६ मे, २०१७

खेळ

आयुष्यात एकदाच माणसाने
खेळावा असा मनापासून डाव..!
असे जपावे जिवापाड भिडूला
चुकून बसू नये जिव्हारी घाव..!
.... प्रल्हाद दुधाळ

वंदन

सगळेच नमतात 
त्या उगवत्या सुर्याला..!
वंदन करावे कधी 
मावळतीच्या दर्याला..!
.... प्रल्हाद दुधाळ.