बाप.
चाहूल लागता पितृत्वाची
मन त्याचे हरखून जाते.
एरवीचे कणखर हृदय
हळुवारपणे हळवे होते.
आगमन आपल्या बाळाचे
आई आत अनुभवत असते
चेहऱ्यावरचे तेज तिच्या
पित्याला सुखावत असते.
आई वेदना सहन करते
बाहेर तो तळमळत असतो
रडू ऐकून नव शैशवाच
बापाचा अडला श्वास सुटतो.
क्षणोक्षणीची प्रगती पाहून
बाललीलांनी जीव त्याचा थोडा
झुकला न कुणापुढे कधीही
खेळात बापाचा त्या होतो घोडा.
दिवस जातात वर्षे जातात
बाप मुलासाठी खपत रहातो
शिकता शिकता एक दिवस
मुलगा बापापेक्षा शहाणा होतो.
तारुण्याच्या त्या कैफात जेंव्हा
आईबापाची या वाटते लाज
शब्दांचे होतात खोलवर घाव
शिव्याशापांचा होतो आवाज.
राजाराणीच्या संसारात आता
म्हाताऱ्याची या अडचण होते
लज्जालक्तरांचे गाठोडे बांधून
वृध्दाश्रमात रवानगी होते.
मान्य श्रावणबाळ नव्या युगात
इतिहासजमा झालेला आहे
ज्याने जपले जीवापाड बाळ
संस्कार सारे विसरला आहे!
खाल्ल्या खस्ता इतक्या ज्यांनी
कर त्यांच्यासाठी एवढे फक्त
कधीमधी वेळात वेळ काढून
दोन शब्द मायेने बोल फक्त.
......प्रल्हाद दुधाळ,
पुणे (९४२३०१२०२०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा